January 14, 2011

पानिपत - अडीचशे वर्षांची ओली जखम

१४ जाने. २०११
दिल्लीचे तख्त राखण्यासाठी धावून गेलेले सह्याद्रीचे मरगठ्ठे आणि हिंदुस्थान काबीज करण्याच्या इराद्याने आलेला अफ़गाण बादशहा अहमदशहा अब्दाली यांच्यातील पानिपत युद्धाला यंदा २५० वर्षे होताहेत.इतकी वर्षे ही जखम मराठी माणूस अश्वत्थाम्याप्रमाणे उरावर घेऊन फ़िरतो आहे.पानिपतच्या या संग्रामात एका दिवसात सुमारे एक लक्ष मराठी वीर धारातीर्थी पडले. श्रीमंत विश्वासराव पेशवे, सदाशिवराव भाऊ यांच्याबरोबरच बुंदेले, होळकर आदी अनेक सरदारही होते. जगाच्या इतिहासात एकाच दिवसात इतक्या प्रचंड संख्येने नरसंहार होण्याची ही एकमेव घटना आहे.अगदी अलीकडे हिरोशिमा व नागासकी अणुस्फ़ोटातसुद्धा दीड लक्ष जपानी नागरिक ठार झाले होते.पण या प्रक्रियेलासुद्धा चार दिवस लागले होते.

पानिपतच्या युद्धाचा मराठी मनावर अगदी खोलवर परिणाम झाला. इतका की अगदी विश्वास गेला पानिपतात, पांचावर् धारण बसणे, सतराशे साठ भानगडी असे वाकप्रचारही रूढ झाले.

वास्तविक पाहता मराठ्यांचा हा पराभव मुळात पराभव नव्हताच. कारण पानिपत संग्रामानंतर केवळ दहा वर्षांनंतरच राखेतून झेप घेणा-या फिनिक्स पक्षाप्रमाणे मराठ्यांनी दिल्लीच्या तख्तावर पुन्हा जम बसवला. अब्दालीने मात्र या युद्धाचा इतका धसका घेतला की त्याने परत पानिपताकडे स्वप्नातसुद्धा पाहिले नाही.

आज या संग्रामाला २५० वर्षे पूर्ण होताना मात्र मनात विचारांचे काहूर ऊठतात.मराठी माणूस प्रांतवाद जपतो, मराठी माणूस संकुचीत मनोव्रुत्तीचा आहे, तो जग पादाक्रांत करण्यास कचरतो अशा अनेक टीका राजकारणी (किंवा इतर) करतात.त्यांना, हिंदुस्थानाची एकता अबाधित राखण्यासाठी सुमारे १५०० कोसांवर असलेल्या पानिपताच्या रणभूमीवर धावून जाऊन आपली प्राणाहुती देणा-या मराठ्यांची आठवण येत नसावी.पानिपतचा रणसंग्राम हेच त्यांना चोख उत्तर आहे.

या संग्रामात आपली प्राणाहुती देणा-या श्रीमंत पेशवे, अनेक सरदार आणि मराठी मातीच्या अनाम लक्ष वीरांना मानाचा मुजरा...!

1 comment:

nimish said...

छान माहिती दिलीत आवडली
पण पानिपतावर मराठे का हरले त्याचे विस्लेषण अजूनही मराठी किवा भारतीय माणसे करत नाहीत त्यमुळे त्याच चुका आपण परत करतो.