January 14, 2011

पानिपत - अडीचशे वर्षांची ओली जखम

१४ जाने. २०११
दिल्लीचे तख्त राखण्यासाठी धावून गेलेले सह्याद्रीचे मरगठ्ठे आणि हिंदुस्थान काबीज करण्याच्या इराद्याने आलेला अफ़गाण बादशहा अहमदशहा अब्दाली यांच्यातील पानिपत युद्धाला यंदा २५० वर्षे होताहेत.इतकी वर्षे ही जखम मराठी माणूस अश्वत्थाम्याप्रमाणे उरावर घेऊन फ़िरतो आहे.पानिपतच्या या संग्रामात एका दिवसात सुमारे एक लक्ष मराठी वीर धारातीर्थी पडले. श्रीमंत विश्वासराव पेशवे, सदाशिवराव भाऊ यांच्याबरोबरच बुंदेले, होळकर आदी अनेक सरदारही होते. जगाच्या इतिहासात एकाच दिवसात इतक्या प्रचंड संख्येने नरसंहार होण्याची ही एकमेव घटना आहे.अगदी अलीकडे हिरोशिमा व नागासकी अणुस्फ़ोटातसुद्धा दीड लक्ष जपानी नागरिक ठार झाले होते.पण या प्रक्रियेलासुद्धा चार दिवस लागले होते.

पानिपतच्या युद्धाचा मराठी मनावर अगदी खोलवर परिणाम झाला. इतका की अगदी विश्वास गेला पानिपतात, पांचावर् धारण बसणे, सतराशे साठ भानगडी असे वाकप्रचारही रूढ झाले.

वास्तविक पाहता मराठ्यांचा हा पराभव मुळात पराभव नव्हताच. कारण पानिपत संग्रामानंतर केवळ दहा वर्षांनंतरच राखेतून झेप घेणा-या फिनिक्स पक्षाप्रमाणे मराठ्यांनी दिल्लीच्या तख्तावर पुन्हा जम बसवला. अब्दालीने मात्र या युद्धाचा इतका धसका घेतला की त्याने परत पानिपताकडे स्वप्नातसुद्धा पाहिले नाही.

आज या संग्रामाला २५० वर्षे पूर्ण होताना मात्र मनात विचारांचे काहूर ऊठतात.मराठी माणूस प्रांतवाद जपतो, मराठी माणूस संकुचीत मनोव्रुत्तीचा आहे, तो जग पादाक्रांत करण्यास कचरतो अशा अनेक टीका राजकारणी (किंवा इतर) करतात.त्यांना, हिंदुस्थानाची एकता अबाधित राखण्यासाठी सुमारे १५०० कोसांवर असलेल्या पानिपताच्या रणभूमीवर धावून जाऊन आपली प्राणाहुती देणा-या मराठ्यांची आठवण येत नसावी.पानिपतचा रणसंग्राम हेच त्यांना चोख उत्तर आहे.

या संग्रामात आपली प्राणाहुती देणा-या श्रीमंत पेशवे, अनेक सरदार आणि मराठी मातीच्या अनाम लक्ष वीरांना मानाचा मुजरा...!

July 07, 2010

स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या त्रिखंडात गाजलेल्या उडीला १०० वर्षे पूर्ण

स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या त्रिखंडात गाजलेल्या आज उडीला १०० वर्षे पूर्ण होत आहेत. १०० वर्षांपूर्वी म्हणजे ८ जुलै १९१० रोजी मार्सेलिस येथे समुद्रात सावरकरांनी उडी मारली होती.

क्रांतीकार्याचे सुत्रधार सावरकरच आहेत असे समजून इंग्लंडमध्ये त्यांना अटक करण्यात आली.इंग्लंडहून मोरिया बोटीतून त्यांची मार्सेलिस बंदरात रवानगी झाली. फ्रान्सच्या मार्सेलिस बंदराला सावरकरांना नेणारी बोट लागली असता इंग्रजी शिपायांच्या हातावर अत्यंत शिताफिने तुरी देऊन त्यांनी फ्रान्सच्या समुद्रात उडी मारली.फ्रान्सच्या भूमीवर त्यांनी पाय ठेवला, परंतु इंग्रज शिपायाच्या लालुचीला बळी पडून फ्रान्सच्या शिपायांनी सावरकरांना इंग्रजांच्या स्वाधीन केले.
स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या प्रेरणादायी स्म्रुतींना त्रिवार अभिवादन...!
॥ वंदे मातरम ॥

विश्वात फक्त आहेत । विख्यात बहाद्दर दोन ॥
जे गेले आईसाठी । सागरास पालांडून ॥
बलभीमानंतर आहे । या विनायकाचा मान ॥

- मनमोहन

May 18, 2010

कोकण भ्रमंती २०१० - भाग ३

कोकण भ्रमंती २०१० - भाग ३

८ मे २०१०

पहाटे ५.३० ला वीरने जेव्हा हाक मारली तेव्हा जागे झालो. आज आमच्या प्रवासाचे दोन टप्पे (खरे तर एकच) होते. एक म्हणजे गणपतीचे दर्शन घेणे व दूसरे म्हणजे मुरूडला जाऊन जंजिरा किल्ला पाहणे. पैकी सकाळी लवकर आवरून सुवर्ण गणेशाचे दर्शन घेऊन आलो. काल रात्री होटेलमध्ये जेवायला गेल्यावर होटेल मालकाने जंजि-याकडे जाण्याचा सोयीस्कर व जवळचा मार्ग सांगितला. तो असा की, दिवेआगरहून मुरूडला by road जाण्यापेक्षा दिवेआगरहून दिघी या गावी जायचे व दिघी बंदरातून थेट जंजि-यावर Launch ने समुद्रसफ़र करायची. आम्ही होटेलमालकाचे suggestion ऐकण्याचे ठरवले. त्याला दोन कारणे होती.एक म्हणजे त्यामुळे आम्हाला मुरूडला वळसा घालून जावे लागणार नव्हते, ज्यामुळे आमचा वेळ, पैसा आणि जवळपास ८० कि.मी. अंतर वाचणार होते आणि दूसरी गोष्ट म्हणजे दिघी हून जवळ जवळ १० कि.मि. चा समुद्रप्रवास कि ज्यासाठी आमच्यातील प्रत्येकजण excited होता.
गणपतीचे दर्शन घेऊन दिघी ला पोहचायला तासभर लागला. ८.३० ला जेव्हा दिघी मध्ये पोहचलो, तेव्हा इथेही हर्णेसारखाच नजारा होता. लोक नुकतेच जागे होत होते. Launch ची तिकिटे काढण्यासाठी Launch office मध्ये गेलो तेव्हा तिथल्या माणसानेदेखील आमच्याकडे त्रासिक चेहरा करून पाहिले. "इतक्या सकाळी सकाळी कशाला आलेत हे इकडे?" असे काहीतरी तो मनातल्या मनात म्हटला असावा.
शनिवार असल्यामुळे गर्दी होणार असे वाटले होते. पण नऊ वाजेपर्यंत काहीच चिन्हे दिसेनात. आम्ही बराच वेळ धक्क्यावर फोटोसेशन करत बसलो होतो. शेवटी launch वाल्यानेच १०० लोकांची launch उण्यापु-या २५-३० प्रवाशांसाठी समुद्रात सोडली आणि राजेशाही थाटात आम्ही जंजिरा काबीज करायला निघालो.
समुद्रात launch आत गेल्यावर मात्र सर्वजण केवळ लाटांकडे बघत होते. बरेच वेळा लाटा जोराने आपटून पाणी आत येत होते. किना-यावरून पाहताना जंजिरा अगदी जवळ असल्याचे भासत होते. पण प्रत्य्क्षात मात्र किना-यावरून किल्ल्यापर्यंत जायला जवळजवळ अर्धा तास लागला.
जसजसे किल्ल्यच्या जवळ पोहोचायला लागलो, तसतसे किल्ल्याचे अजस्त्र व विराट रूप नजरेत भरू लागले. सिद्दिचा जंजिरा हा किल्ला शेवटपर्यंत अजिंक्य का राहिला हे त्या किल्ल्याची भक्कम बांदणी व मोठमोठाले बुरूज व तटबंदी बघितल्यावरच समजले.. तब्बल बावीस एकरांत पसरलेला हा महाकाय दुर्ग केवळ अवर्णनीय आहे. समुद्रातून किल्ल्याचे प्रवेशद्वार सहजी नजरेस पडू नये अशा खुबीने बांधले आहे.
किल्ल्यापासून तीन-चारशे मीटर अंतरावर आमची launch पाण्यातच थांबली व किल्ल्यापासून एक छोटी होडी आम्हाला pick up करायला आली. तिच्यातून बसून आम्ही किल्ल्यावर प्रवेशते झालो. अजस्त्र दरवाजा व बुरूजांवरील भल्या मोठ्या तोफा बघूनच शत्रूला धडकी भरावी असे ते बांधकाम होते.
किल्ल्यात आत गेल्या गेल्या एक गाईड आम्हा होडीतल्या उतारूंकडे आला.त्याने आम्हाला टिपीकल गाईडच्या आवाजात माहिती सांगायला सुरूवात केली व संपूर्ण किल्ला दाखवण्यासाठी ५५०/- रू. लागतील असे म्हणाला. ५५०/- रू. चा आकडा ऐकल्यावर मात्र आम्ही सर्वांनी त्याची अशी काही खेचली व त्याला टोमणे मारले की बस्स्...त्याने आमच्या ग्रुपचा नादच सोडून दिला व तो पळून गेला. यावर आमच्यातील एकाने "गनीम भाग गया..." अशी टिप्पणी केली व आम्ही सारेचजण हास्यकल्लोळात बुडालो...
जंजीरा पाहताना मात्र त्याकाळच्या प्रचंड वैभवाची कल्पना आली. किल्ल्याच्या आतमध्ये आता केवळ पडके अवशेष आहेत. एका बुरूजावर 'कलाल बांगडी' नावाची तोफ ठेवली होती. पुरंदरेंचे 'राजा शिवछत्रपती' वाचताना या तोफेचा उल्लेख आला होता. केवढी मोठी व अजस्त्र तोफ!समुद्रातून येणा-या शत्रूच्या गलबताच्या एका धडाक्याबरोबर चिंधड्या उडवून टाकेल अशी...!!
किल्ल्यावर आतमध्ये गोड्या पाण्याचे दोन मोठे तलाव आहेत. बेफ़ाम लाटांशी, वा-याशी स्पर्धा करत हा किल्ला असा उभा आहे की वाटते त्याला अजून हजार-दोन हजार वर्षे तरी काही होणार नाही.
किल्ल्यावरील दरबार वगैरे पाहून झाल्यावर व किल्ला फिरून झाल्यावर सर्वजण परत मुख्य दरवाज्यापाशी जमलो. अक्षरशः boiler मध्ये ठेवल्यासारखे उकडत होते. इतका प्रचंड उकाडा होता की बस्स... आमचे कपडे घामाने डबडबले होते. महाराष्ट्रातल्या इतर किल्ल्यांसारखीच याचीही अवस्था आहे. शासनाची अनास्था, लोकांना इतिहासाचे न कळलेले महत्त्व आणि ऐतिहासिक ठिकाणे खराब करण्याची, त्यांची अवहेलना करण्याची मनोवृत्ती हे सर्व पाहून मन विषण्ण झाले.
दूरवरून launch आमची येताना दिसली. परत लहान होडीने आम्ही launch कडे निघालो. दुपारचे बारा वाजत होते.उन तापले होते. आता मात्र launch मधून सुमारे दीड दोनशे पर्यटक आले होते. जाताना आम्ही जसे उत्स्साहात होतो तसेच ते आता होते. किल्ला फिरल्यावर मात्र आमची जी अवस्था झाली त्यावरून असे वाटले की त्या सिद्दिने जंजिरा इतकी वर्षे कसा काय सांभाळला ते त्यालाच माहित... :)
Launch मधून परत दिघी कडे निघालो. जाताना एक मोठे परदेशी मालवाहू जहाज दिसले. जाताना वारे लागल्यामुळे जरा हायसे वाटले. किना-यावर उतरल्या उतरल्या थंडगार सरबत घेतले व return journey साठी गादीत येऊन बसलो. परत जाताना आलो त्याच मार्गे म्हणजे चिपळूण-देवरूख-संगमेश्वर-आंबा-कोल्हापूर जाण्याचे ठरवले.
आम्ही उन्हातून इतका प्रवास केला होता, पण संपूर्ण प्रवासात कुणालाही थकवा जाणवला नाही.
खरं म्हणजे अशा ट्रीप्स प्रत्येकाने वर्षातून किमान एकदा तरी केल्याच पाहिजेत.अशाने मनाची व शरीराची दोहोंची refreshment होते. वास्तविक समुद्रदर्शन हा लिहिण्यासाठी एक वेगळा विषय होऊ शकतो. पण थोडक्यात सांगायचे झाले तर जर एखाद्याला आपण खूप मोठे झालो आहोत किंवा खूप शहाणे झालो आहोत असे वाटू लागले, तर त्याने सरळ कोकणात एखाद्या समुद्र किना-यावर यावे, एखाद्या शांत आणि एकांत कड्यावर बसून अथांग आणि जिकडे नजर पडेल तिकडे पसरलेल्या अफाट रत्नाकराला, दर्याला पहावे म्हणजे आपण किती क्षूद्र आहोत व आपल्या मोठेपणाचा अहंकार किती मिथ्या आहे हे कळून चुकेल...
कोल्हापूरात पोहचायला रात्री ९.३० वाजले. घरी आल्या आल्या बहिणीने पहिला प्रश्न केला - "काय रे, चेहरा किती काळा पडला आहे उन्हाने?"
तिला कसे सांगू मी मनातून किती उजळलो होतो ते....???

May 17, 2010

कोकण भ्रमंती २०१० - भाग २

दि.७ मे २०१०
आमच्या ट्रीपचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे माझे सहकारी कधी नव्हे ते लवकर उठून तयार होत होते.त्यामुळे आम्हाला कोठेही उशीर वगैरे झाला नाही.सर्व् अगदी ठरवल्यासारखे वेळेत पार पडले.दुस-या दिवशी पहाटे ५ ला च मला आणि अमोलला जाग आली. आणि सर्वांना उठवण्याचे काम अमोलने खोड्या करून अगदी चोख पार पाडले. ६.३० वाजताच आवरून सर्वजण तयार होतो.रूमवरच सर्वांनी घरून आणलेले नाष्ट्याचे पदार्थ उदा. चकली,लाडु,भडंग वगैरे खाऊन नाष्टा आवरला व ७ ला आम्ही दापोली सोडले.दापोलीजवळच हर्णे बंदर आहे.तिथे एक भुईकोट किल्ला व सुवर्णदुर्ग आहे. हर्णे गावात पोचताच आमचे स्वागत झाले ते नाकातून घशात उतरणा-या मासळीच्या वासाने. चहूबाजूला नुसती सुकट वाळत घातली होती.कोळंबी, बोंबील असे नाना त-हेचे मासे वाळत घातलेले आम्हाला बघायला मिळाले. वा! सकाळी सकाळी काय सुंदर नजारा!! मला कुठल्याशा हिंदी सिनेमातले " In the morning by the sea..." हे गाणे आठवले.खरोखरच इथून पूर्णपणे आमचा रोड जंजि-यापर्यंत किना-याला लागूनच होता. Fully costal road....
८.३० ला आम्ही हर्णेच्या भुईकोट किल्ल्यावर पोचलो तेव्हा सारा गाव नुकताच जागा होत होता.काही मच्छीमारांनी लवकरच बोटी समुद्रात नेल्या होत्या.दूरवरच्या समुद्रात त्यांची शिडं चमकत होती.हर्णेचा भुईकोट किल्ला एका छोटेखानी टेकडीवजा डोंगरावर उभा आहे.आम्ही गेलो तेव्हा किल्ल्यच्या मेन दरवाज्याला भले मोठे कुलूप होते. मग काय, सरळ मार्ग बंद झाला की वाकड्यात शिरायचे हे माझ्या मित्रांना सांगावे लागत नाही.सर्वजण किल्ल्याच्या मागील बाजूकडून बुरूजावर चढले.तिथे भरपूर फोटो काढले.किल्ल्यापासून थोड्या अंतरावर समुद्रात सुवर्णदुर्ग दिसत होता.:-)तिथे येथेच्छ फिरून झाल्यावर परत निघालो. आता डोंगर उतरताना मात्र सर्वांची गंमत झाली.डोंगराला अगदी तीव्र उतार आहे आणि जरासा जरी पाय घसरला तर एका बाजूने थेट समुद्रातच...त्यामुळे झाताना जितक्या उत्साहाने व गंमतीने किल्ल्यावर चढलो त्याच्या कितीतरी पट अधिक खबरदारी डोंगर उतरताना घ्यावी लागली.बाकी एक मासळीचा उग्र दर्प सोडला तर हर्णे गाव खरोखरीच मस्त आहे. पण तोही इथल्या लोकांचा एक अविभाज्य भागच आहे. अर्थात असा दर्प मला जवळपास सर्वच बंदरांवर अनुभवायला मिळाला, म्हणून आम्ही थोडेच गाडीत बसणार होतो???
९ वाजताच उन मी म्हणत होते.आमची गाडी पुन्हा एकदा costal road वरून आंजर्ल्याला निघाली.अत्यंत सुंदर निसर्गवैभव आम्ही सगळेच जण enjoy करत होतो. दूरवर दिसणारे आंजर्ले गाव, तिथला खाडीतला पूल हे सारेच मनमोहक दिसत होते.आंजर्ले गावानजीकच 'कड्यावरचा गणपती' हे स्थान आहे.तिथे जातानाच एका spot वरून समुद्र,बीचचे ultimate दृश्य दिसले. तो scene इतका सुंदर होता की आम्ही गाडी थांबवून फोटो काढण्याचा मोह नाही आवरू शकलो.दृश्य इतके सुंदर होते की आम्ही पाहतच राहिलो. एका बाजूने जमिनीचा काही भाग थेट् समुद्रात शिरला होता. तिथली हिरवीगार नारळाची, माडाची झाडं ही निळ्या समुद्राच्या अंगठीच्या खोबणीत बसवलेल्या टपो-या पाचूप्रमाणे भासत होती आणि वर स्वच्छ निरभ्र आकाश...दुरवर क्षितीज आणि समुद्र एकमेकांत असे मिसळून गेले होते की वाटलं त्यांना एकमेकांपासून दूर करणं साक्षात विधात्यालाही जमणार नाही. केवळ अवर्णनीय असं ते दृश्य होतं. निसर्गाने मनुष्याला किती भरभरून दिले आहे आणि तेही फुकट...!!! ख-या आनंद देणा-या गोष्टी अशाच निर्भेळ आणि शाश्वत असतात....
पुढे कड्यावरच्या गणपतीला जायला निघालो. रस्ता इतका अरूंद होता की एकावेळी कशीबशी एकच गाडी (खरं म्हणजे अर्धीच :D) पुढे जावी. अक्षरशः डोंगराच्या कड्यावर असलेला हा गणपती पहायला डोंगरावर गाडी न्यावी लागते. मात्र मंदिरात गेल्यावर छान वाटते.स्वच्छ मंदिर, मोठे आवार आणि बाजूने आंब्याची झाडे..दर्शन घेऊन आम्ही पुढच्या प्रवासाला निघालो.....
आमचे पुढचे डेस्टीनेशन होते केळशी. केळशी म्हणजे अत्यंत छोटे पण सुबक् आणि प्युअरली कोकण म्हणता येईल असे गाव. दाट हिरवीगार झाडी, दूरवर पसरलेल्या आंब्याच्या बागा आणि उंच् उंच माड. केळशीमध्ये महालक्ष्मीचे मंदिर आहे.तिथे दर्शन घेऊन जवळच असलेल्या 'याकुब बाबां'च्या दर्ग्यात गेलो. छत्रपती शिवाजी महाराजांनीही याकुब बाबांचे दर्शन घेतले होते.त्यावेळी त्यांनी दर्ग्यासाठी काही जमीन इनाम दिली होती,ती आजही आहे. केळशी गाव खरोखरच खूप मस्त आहे. अगदी remote kokan...
ट्रीप सुरू झाल्यापासून आमचा एकही spot आम्हाला bore वाटला नाही.उलट उत्तरोत्तर ट्रीप रंगतच गेली.
केळशीहून बाणकोटला आलो.बाणकोटच्या किल्ल्यावरून समुद्रात पाहताना तर अंगावर शहारे आले होते. भन्नाट रोंरावणारा वारा, डोंगरावरचा किल्ला, त्याचे मोठमोठाले बुरूज सारंच अद्भुत होतं. तिथे एका बुरूजाखाली सारेजण बसून राहिलो.दूरवर दिसेल तिकडे केवळ समुद्रच होत. नुसती कल्पना केली की रात्रीच्या वेळी जर तिथे बसून राहिलो तर काय सुंदर वाटेल, दूरवर मिणमिणणारे होड्यांवरचे दिवे,बेभान वारा आणि स्तब्ध करणारी शांतता...!!! पण रात्रीपर्यंत थांबणे आमच्या नशीबात नव्हते म्हणून आम्ही पुन्हा एकदा ते दृश्य imagine करून परतीला निघालो. जाताना वाटेत एक म्हातारबाबा भेटला. त्याने आम्हाला झाडावरून कै-या काढून दिल्या.म्हातारा फारच काटक होता, ८७ वर्षे वय होते, पण वाटत नव्ह्तं...
बाणकोटहून हरिहरेश्वरला गेलो. अंतर फारसे नाही. त्यामुळे लगेच पोचलो. हरिहरेश्वरचे वर्णन मी अनेकांकडून ऐकले होते की खूपच ultimate spot आहे वगैरे, पण प्रथमदर्शनी मला ultimate वगैरे काही वाटले नाही. हरिहरेश्वराचे दर्शन घेऊन मंदिराच्या पिछाडीस असलेल्या डोंगरावर प्रदक्षिणा मार्गाकडे गेलो. भयंकर उकडत होते. एका spot ला आम्ही सर्वजण जागच्या जागी थबकलो.आपल्या समोरून एक बंद पडदा उघडावा आणि प्रचंड मोठा सोनेरी खजिना हाती पडावा असे ते दृश्य होते. हरिहरेश्वरचे वर्णन सारेजण ultimate या शब्दाने का करत होते हे तो spot बघितल्यावर मला समजले. दोन कातीव कड्यांमधून प्रदक्षिणा मार्ग थेट समुद्रात जात होता. उंच म्हणजे कमीत कमी तीन-चारशे फूट उंचीचे ते कडे होते. त्यातून जाणारी वाट म्हणजे जणू खिंडच..! समोर खालच्या बाजूस फेसाळणारा समुद्र आणि त्यालगतचा प्रदक्षिणा मार्ग. खरंच मी खूप समुद्रकिनारे पाहिलेत, पण असे दृश्य कधीच पाहिले नव्हते. Wonderful, Beautiful, Incredible वगैरे जितकी विशेषणे लावावीत तितकी कमीच...
कड्यांवरून उतरून खाली कातळांवर उतरलो. काळ्या कुळकुळीत फत्तरांपासून तयार झालेला प्रदक्षिणा मार्ग. मागच्या बाजूला मोठे फत्तरी कडे. समुद्रच्या लाटा,वारा,उन यांच्या अभिक्रियेमुळे त्या कड्यांनादेखील मोठ्मोठी धारधार छिद्रे पडली होती. एकदम photogenic location होते...मग काय, आमच्या कॅमे-यांचा लगेच क्लिकक्लिकाट सुरू झाला. खाली कातळावर बसून मागून लाटा उफाळणारे अनेक फोटो काधले. तेवढ्यात आमच्यातल्याच एकाचा आवाज आला, तो ओरडत होता "डॉल्फिन, डॉल्फिन". त्याच्या बोटाच्या दिशेने पाहिले तर डॉल्फिनच्या दोन जोड्या आमच्यापासून अगदी जवळून म्हणजे ४०-५० फूटांवर् पोहत होत्या. काय वर्णावे या आनंदाला. हे म्हणजे "सोने पे सुहागा" ठरले. हस-या चेह-याच्या त्या dolphins चे आम्ही shooting देखील केले. इतक्या सुंदर अविष्कारांनंतर आमचा उकाडा कुठल्या कुठे पळून गेला, खूप मजा केली. बागडलो. प्रदक्षिणा मार्गावरूनच पुढे जाताना खास कोकणी चवीचे जांभूळ सरबत प्यालो. मस्त tasty होते.
हरिहरेश्वरच्या किना-यावर किती वेळ गेला कळालेच नाही. पण भूक जोरात लागल्यावर मात्र सर्वजण जागे झाले. हरिहरेश्वरचा समुद्र मात्र अत्यंत धोकादायक आहे. समुद्रात पोहायला परवानगी नाही.
हरिहरेश्वरच्या मंदिरापासून जवळच एका होटेलमध्ये जेवायला गेलो. स्वच्छ सारवलेले आवार व नारळाच्या झावळ्यांपासून बनवलेला मंडप असे ते छोटेखानी होटेल होते. लाकडी फळ्यांपासून बनवलेल्या बेंचवर सर्वजण बसून जेवणाची वाट बघू लागलो. पोटात कावळे ओरडत होते, उन तापले होते व उकाडा तर मी म्हणत होता. जेवण येईपर्यंत नुसते पाणीच पित होतो. थोड्याच वेळाने मस्त गरमा गरम कोकणी स्वादाचे जेवण आल्यावर सर्वांनी येथेच्छ ताव मारला.सोलकढी, कोकणी आमटीची टेस्ट अप्रतिम होती.इथे परत आम्हाला आमच्या बोलीचालीवरून आम्ही कोल्हापूरी आहोत हे इथल्या होटेलमालकाने बरोबर ओळखले. खरंच, आपलं गाव हीच आपली ओळख असते.
हरिहरेश्वरहून निघालो ते श्रीवर्धनला जायला. श्रीमंत थोरल्या बाजीराव पेशव्यांचे जन्मस्थान म्हणून मनात एक आस लागून राहिली होती. पण जेव्हा तिथे पोचलो, तेव्हा किंचीत निराशा झाली. श्रीवर्धनचा पेशव्यांचा वाडा म्हणजे आता एक छोटीशी शाळा आहे. इतका महान सेनानी, पण त्याचे एखादे चांगले स्मारक त्याच्याच जन्मगावात असू नये याचे राहून राहून वाईट वाटले.असो, काही गोष्टींना इलाज नसतो.
श्रीवर्धनमध्ये पोचल्यावर एक गंमत झाली. गावातून आम्हाला पेशव्यांच्या वाड्याकडे आणि श्रीवर्धनच्या बीचकडे जायचा मार्ग हवा होता. एका रिक्षा स्टॉपच्या डावीकडे वाडा तर उजवीकडे बीच होता. स्टॉपवर एकच रिक्षा होती, त्या रिक्षावाल्याला आम्ही मार्ग विचारला, तर त्या पठ्ठ्याने वर देखील न बघता, काहीही न बोलता केवळ बोटवारे (जे हाताने करतात ते हातवारे आणि बोटाने करतात ते बोटवारे हीः हीः हीः ) करून रस्ता दाखवला. आम्ही चारपाच वाक्ये बोललो, पण भिडू एक अक्षरही बोलला नाही. च्यायला इथले लोक असे बाहेरचे कोणी आल्यावर असे का बुजतात ते मला शेवटपर्यंत कळले नाही...
श्रीवर्धनचा बीचही म्हणावा तितका स्वच्छ वाटला नाही. त्यामुळे वेळ न दवडता आम्ही थेट दिवेआगरकडे कूच केले.
दिवेआगर हे मस्त टिपीकल कोकणी खेडेगाव. अत्यंत स्वच्छ, टापटीप असलेले गाव बघता क्षणीच आम्हा सर्वांना खूप आवडले. दिवेआगरला गणपतीचे मंदिर आहे. दहा-बारा वर्षांपूर्वी गावातील एका स्त्रीला संकष्टीच्या दिवशी सोन्याच्या गणपतीची मूर्ती सापडली होती. ती मूर्ती या मंदिरात ठेवली आहे. अत्यंत सुबक, रेखीव नक्षीम केलेली ही मूर्ती पेशवेकालीन असल्याचे तेथील लोकांनी सांगितले.
दिवेआगरमध्ये पोचल्यावर पहिल्यांदा रहायची व्यवस्था करणे महत्त्वाचे होते. पण प्रश्न लगेच सुटला. दातार काकांच्या 'लक्ष्मी-केशव' निवासामध्ये आम्हाला जागा मिळाली, तीही अगदी reasonable rate मध्ये. दिवेआगरमध्ये घराघरांमध्ये अशी घरगुती निवासाची व्यवस्था आहे.
आम्ही राहिलो होतो ती खोली घराच्या मागच्या बाजूस होती. स्वच्छ सारवलेले अंगण,परसदारी आंबा,माड,रातांब्याची झाडं, विहीर असं मस्त वातावरण होतं. रूमवर आल्यावर फ्रेश झालो. समुद्राची गाज ऐकू येत होती. समुद्र पुन्हा खुणावत होता. म्हणून सर्वजण बर्म्युडा, टोवेल घेऊन बीचकडे रवाना झालो.
दिवेआगरचा समुद्र म्हणजे केवळ अप्रतिम!!! अतिशय स्व्च्छ किनारा आणि मुख्य म्हणजे गर्दी, गोंगाट, कोलाहल यांपासून दूर. आम्ही गेलो त्यावेळेस अगदी तुरळक गर्दी होती.
फटाफट सगळे पाण्यात उतरलो,अगदी गळ्यापर्यंत पाण्यात गेलो, पण समुद्रा एकदम safe वाटला. खूप दंगामस्ती केली, खेळलो, उड्या मारल्या, जवळजवळ दोन तास मनसोक्त डुंबलो व सुर्यास्त बघून रूमवर परतलो. अंगाला लागलेले खारे पाणी चटचटत होते. म्हणून विहिरीच्या थंडगार पाण्याने अंघोळ करून फ्रेश झालो.
७.३०- ८ च्या सुमारास गाव बघायला बाहेर पडलो. पण गाव एकदम छोटा. त्यामुळे किती आणि काय काय बघणार? रूमवर आलो. येता येता रात्रीच्या जेवणाची एका होटेलमध्ये ओर्डर दिली व पत्त्यांचा एक कॅट विकत घेऊन रूम वर आलो.
९.१५ च्या दरम्यान होटेलमध्ये जेवायला गेलो. मस्त गावरान चिकन केले होते. ('मस्त' हा शब्द मित्रांच्या सांगण्यावरून लिहित आहे. मी vegetarian आहे, त्यामुळे मी नुसताच नारळी भात वगैरे खाल्ला. आणि तोही मस्तच होता....:D ). Unlimited जेवण असल्यामुळे सर्वांनी भरपेट ताव मारला व १०.३० च्या सुमारास रूम वर परत आलो.
सर्वांना गुंगी आली होती, त्यातच समुद्रात दंगामस्ती केल्याने हातपाय दुखू लागले होते. तरीही लवकर न झोपता 'मेंढीकोट' चा डाव मांडून बसलो. बराच वेळ पत्ते खेळत होतो. रात्री पत्ते खेळत खेळत एक एक मेंबर निद्रादेवीच्या केव्हा अधीन झाला हे कळले देखील नाही.....

May 16, 2010

कोकण भ्रमंती २०१० - भाग १

लहानपणी शाळेमध्ये असताना दिवाळीच्या अगर उन्हाळी सुट्टीमध्ये मी कोकणात नेहमी फिरायला जायचो. अर्थात कोकण म्हटले की ठराविक गावे ठरलेली. मी राहतो कोल्हापुरात, त्यामुळे आमच्यासाठी कोकणची टूर म्हणजे आंबा घाट उतरुन रत्नागिरी,गणपतीपुळे,पावस हा मार्ग ठरलेला. काहीवेळा नातेवाईकांकडे लांजा,राजापूर, कुडाळ येथेही जाण्याचा योग आला. त्यामुळे जवळच्या तारकर्लीपासून अगदी गोव्यापर्यंतचा कोकणपट्टा पिंजून काढलेला. करूळ घाट, फोंडा घाट हे रस्ते ओळखीचे वाटायचे, वाटतात.परवा सहज मनात आले की यंदा आपण जरा वेगळ्या धाटणीचा प्रवास करू. वेगळा म्हणजे असा की जो आपल्याला माहिती नाही अशा destinations चा.मग चक्रे फिरू लागली, नेटवरून माहिती गोळा करून रूट फिक्स केला.

एकूण तीन दिवस दोन मुक्कामांसह हा प्रवास आम्ही ठरवला आणि मी व माझे सात सहकारी यांच्यासह कोकणपट्टीच्या प्रवासाला नावही देऊन टाकले - "कोकण भ्रमंती २०१०".

रूट-
गुहागर-दाभोळ-दापोली-हर्णे-आंजर्ले-केळशी-बाणकोट-हरिहरेश्वर-श्रीवर्धन-दिवेआगर-मुरूड जंजीरा

या प्रवासात मला खुप निरनिराळे अनुभव आले. काही मजेशीर,काही थ्रिलींग तर काही विचार करायला लावणारे, पण सोबतीला उत्साही सहकारी आणि तेही trip च्या मूड मध्ये असले की प्रवास हा अगदी refreshing च असतो याची प्रचिती मी पुन्हा एकदा घेतली...

दि.६ मे २०१०-

अगदी सुरूवातीपासूनच आम्ही प्रवासाचे प्लॅनिंगप्रमाणे execution करायचे ठरवले होते(?), पण म्हणतात ना की प्लॅनिंग हे फक्त कागदावरच असते, प्रत्यक्षात मात्र थोडेफार changes हे करावेच लागतात, हे आम्हाला ट्रीपच्या अगदी पहिल्या टप्प्यात मान्य करावेच लागले. आमच्या ठरलेल्या प्लॅनिंगप्रमाणे पहिले destination हे रत्नागिरी जिल्ह्यातील 'गुहागर' हे होते. तिथे जाण्यासाठी आम्ही कराड, कुंभार्ली घाटातून उतरून चिपळूण व तिथून पुढे गुहागर असा मार्ग ठरवला होता. पण आमच्या काही सहका-यांच्या हट्टामुळे आंबा घाटमार्गे साखरपा, देवरूख, संगमेश्वर्,चिपळूण असे जायचे ठरले. सकाळी ६.३० ला प्रयाण केले. पहाटे लवकर उठून आवरल्यामुळे सर्वांना सपाटून भूक लागली होती.मलकापुरातील मिलन होटेलमध्ये मस्तपैकी सर्वांनी नाष्टा केला व पुन्हा रस्त्याला लागलो. आमच्यातील काहीजण पहिल्यांदाच कोकण प्रवासाला निघाले होते. त्यामुळे त्यांना कोकणातले स्वच्छ चकचकीत रस्ते, मोठमोठाले वृक्ष हे सर्व नवीन होते. सर्वजण डोळे विस्फारून निसर्गाचे रूप पाहत होते. सोबतीला चेष्टा,मस्करी, दंगा,गाणी हे सुरूच होते. मला मात्र मी न पाहिलेल्या destinations च्या दर्शनाची आणि मला आवडणा-या कोकणच्या सफरीची ओढ लागून राहिली होती, त्यामुळे मी त्याच विचारात होतो.अर्थात त्यावेळी मीही चेष्टा,मस्करी,दंगा करतच होतो आणि निसर्गाचे देणेही बघत होतो.
गुहागरला जाताना वाटेत डाव्या बाजुला 'हेदवी' गावाचा फाटा लागतो,तर उजव्या बाजूस 'वेळणेश्वर' गावाचा रस्ता लागतो.ही दोन्ही गावे आमच्या टूर प्लॅन मध्ये नव्हती.समोरचा रस्ता सरळ गुहागरला जात होता.पण जवळपास कुठेच मार्गदर्शक बोर्ड नव्हता, म्हणून चौकात एका दगडावर बसलेल्या म्हातारीला गुहागरचा रस्ता विचारला. माणसाला बोलायला जर का पैसे पडले असते तर जसा चेहरा होईल, तसा काहीसा चेहरा करून म्हातारीने केवळ हातानेच सरळ जाण्यास खुणावले.आम्ही सरळ गुहागरला पोचलो.तिथं प्रथमच समुद्रदर्शन झाले.समुद्र पाहिल्यावर आम्च्यातले काहीजण अक्षरशः आनंदाने वेडे होऊन नाचू लागले. काही उत्साही मंडळींनी तर सरळ बर्म्युडा परिधाना करून समुद्राकडे कूच केले. आमच्या उत्साहाकडे पाहून तिथल्या काही स्थानिक मंडळींनी एका सेकंदात आम्ही घाटावरून आलो आहोत (म्हणजेच आम्ही 'घाटी' आहोत :-D ) हे ओळखले.
ट्रीपमध्ये ज्या ज्या वेळी समुद्र पाहिला त्या त्या वेळी मला समुद्राचा वेगळाच भाव जाणवला. गुहागरचा समुद्र म्हणजे खोडकर खेळगड्यासारखा वाटला.भरदुपार असूनसुद्धा पाणी तसे थंडच होते.समुद्र मधूनच मोठ्या लाटांसह खवळायचा.आमच्यातील काहीजणांचे पाय खेचायचा.आम्ही खूप दंगा केला,मनसोक्त तासभर डुंबलो. स्वच्छ समुद्रकिनारा,सुरूची व नारळाची झाडे यामुळे गुहागर नयनरम्य वाटले.समुद्रात पोहून झाल्यावर किना-यावर अंघोळीसाठी आलो.तिथे किना-यावरील घरांमध्ये अल्प दरात अंघोळीची सोय आहे. विहिरीच्या थंडगार पाण्यात अंघोळ आटोपली. समुद्रात खेळल्यामुळे सर्वांना आता जोराने भूक लागली होती व सर्वांच्या जिभा अस्सल कोकणी जेवणाच्या स्वादासाठी आसुसल्या होत्या...
किना-याजवळच एक छोटे होटेल होते. तिथे घरगुती पद्धतीचे कोकणी जेवण मिळाले.मी स्वतः शाकाहारी आहे, पण आमच्यातल्या काहीजणांना खास कोकणी मच्छी खाण्याची हुक्की आली होती. पण उशीर झाल्यामुळे सर्वांनाच शाकाहारी जेवणावरच भागवावे लागले.मस्त कोकणी खोब-याची आमटी व सोलकढीमुळे छान वाटले.
आज आमचा मुक्काम दापोलीला होता व आमच्याकडे अजून sufficient time होता.त्यामुळे गुहागरपासून २५ कि.मी. परत मागे हेदवीला जाऊन, तिथला दशभुजा गणेश पाहून वेळणेश्वरही करायचे ठरवले. हे दोन्ही spots आमच्या प्लॅनिंगमधले bonus spots ठरले.हेदवीचा गणपती डोंगरावर आहे.तिथे जाण्यासाठी घाट चढावा लागतो.पण मंदिर छान आहे. दुपारची वेळ असल्याने मंदिराच्या आवारातील फरशी चांगलीच तापली होती.

गणपतीचे दर्शन घेतल्यावर परिसरात सर्वांनी फोटोसेशन केले. मंदिर पेशवेकालीन असल्याचे समजले.तिथून परत येताना सारेजण वेळणेश्वराला गेलो होतो. अत्यंत सुंदर मंदिर व स्वच्छ समुद्रकिनारा लाभलेले वेळणेश्वर हे खरोखरीच नयनरम्य आहे.
दूरवर पसरलेला समुद्रकिनारा पहात आम्ही एका होटेलात बसून कोकम सरबत प्यालो, अगदी original स्वादाचे. कोकम प्याल्यावर आपण शहरात पितो त्या कोकम सरबताची मला कीव कराविशी वाटली. गुहागरच्या प्रवासाला हेदवी व वेळणेश्वर च्या साथीने चार चांद लागले.आम्ही परत गुहागरच्या दिशेने निघालो.दापोलीला जाण्यासाठी धोपवेमार्गे फेरीबोटीधून प्रवास करावा लागतो. हा आमच्यातील बहुतेक जणांचा पहिलाच फेरीबोट प्रवास.आमच्यासारखेच इतरही अनेक प्रवासी होते. त्यांच्या बसेस,गाड्या सामावून फेरीबोट पलीकडच्या किना-याला लागली.आमच्यासाठी हा experience अगदी नविन व निराळा होता.खुप मजा आली.पुष्कळ फोटो काढले.पलीकडच्या किना-यावरून आम्ही दाभोळच्या दिशेने निघालो.वाटेत जाताना दाभोळचा बहुचर्चित (बंद पडलेला की पाडलेला?) दाभोळ वीज प्रकल्प पाहिला.
रात्री ८.३० च्या सुमारास दापोलीला पोचलो.दापोली हे कोकणातले छोटेसे टुमदार शहर आहे.तिथे एका लोजवर hall घेऊन राहिलो.अगदी माफक दरात मस्त hall मिळाला.एका होटेलध्ये शाकाहारी व मच्छी असे दोन्ही प्रकारचे जेवण मिळाले.त्यामुळे सर्वच जण खुष झाले.ट्रीपचा पहिला दिवस अगदी मजेत छान गेला.एवढा प्रवास करूनही जराही थकवा अगर कंटाळा वाटत नव्हता.दुस-या दिवशी लवकर उठायचे म्हणून लवकर झोपी गेलो.झोपताना डोळ्यांसमोर होते ते कोकणातले स्वच्छ रस्ते,हिरवीगार झाडी, गुहागरचा समुद्र आणि बरेच काही....