दि.७ मे २०१० आमच्या ट्रीपचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे माझे सहकारी कधी नव्हे ते लवकर उठून तयार होत होते.त्यामुळे आम्हाला कोठेही उशीर वगैरे झाला नाही.सर्व् अगदी ठरवल्यासारखे वेळेत पार पडले.दुस-या दिवशी पहाटे ५ ला च मला आणि अमोलला जाग आली. आणि सर्वांना उठवण्याचे काम अमोलने खोड्या करून अगदी चोख पार पाडले. ६.३० वाजताच आवरून सर्वजण तयार होतो.रूमवरच सर्वांनी घरून आणलेले नाष्ट्याचे पदार्थ उदा. चकली,लाडु,भडंग वगैरे खाऊन नाष्टा आवरला व ७ ला आम्ही दापोली सोडले.दापोलीजवळच हर्णे बंदर आहे.तिथे एक भुईकोट किल्ला व सुवर्णदुर्ग आहे. हर्णे गावात पोचताच आमचे स्वागत झाले ते नाकातून घशात उतरणा-या मासळीच्या वासाने. चहूबाजूला नुसती सुकट वाळत घातली होती.कोळंबी, बोंबील असे नाना त-हेचे मासे वाळत घातलेले आम्हाला बघायला मिळाले. वा! सकाळी सकाळी काय सुंदर नजारा!! मला कुठल्याशा हिंदी सिनेमातले " In the morning by the sea..." हे गाणे आठवले.खरोखरच इथून पूर्णपणे आमचा रोड जंजि-यापर्यंत किना-याला लागूनच होता. Fully costal road....
८.३० ला आम्ही हर्णेच्या भुईकोट किल्ल्यावर पोचलो तेव्हा सारा गाव नुकताच जागा होत होता.काही मच्छीमारांनी लवकरच बोटी समुद्रात नेल्या होत्या.दूरवरच्या समुद्रात त्यांची शिडं चमकत होती.हर्णेचा भुईकोट किल्ला एका छोटेखानी टेकडीवजा डोंगरावर उभा आहे.आम्ही गेलो तेव्हा किल्ल्यच्या मेन दरवाज्याला भले मोठे कुलूप होते. मग काय, सरळ मार्ग बंद झाला की वाकड्यात शिरायचे हे माझ्या मित्रांना सांगावे लागत नाही.सर्वजण किल्ल्याच्या मागील बाजूकडून बुरूजावर चढले.तिथे भरपूर फोटो काढले.किल्ल्यापासून थोड्या अंतरावर समुद्रात सुवर्णदुर्ग दिसत होता.:-)

तिथे येथेच्छ फिरून झाल्यावर परत निघालो. आता डोंगर उतरताना मात्र सर्वांची गंमत झाली.डोंगराला अगदी तीव्र उतार आहे आणि जरासा जरी पाय घसरला तर एका बाजूने थेट समुद्रातच...त्यामुळे झाताना जितक्या उत्साहाने व गंमतीने किल्ल्यावर चढलो त्याच्या कितीतरी पट अधिक खबरदारी डोंगर उतरताना घ्यावी लागली.बाकी एक मासळीचा उग्र दर्प सोडला तर हर्णे गाव खरोखरीच मस्त आहे. पण तोही इथल्या लोकांचा एक अविभाज्य भागच आहे. अर्थात असा दर्प मला जवळपास सर्वच बंदरांवर अनुभवायला मिळाला, म्हणून आम्ही थोडेच गाडीत बसणार होतो???
९ वाजताच उन मी म्हणत होते.आमची गाडी पुन्हा एकदा costal road वरून आंजर्ल्याला निघाली.अत्यंत सुंदर निसर्गवैभव आम्ही सगळेच जण enjoy करत होतो. दूरवर दिसणारे आंजर्ले गाव, तिथला खाडीतला पूल हे सारेच मनमोहक दिसत होते.आंजर्ले गावानजीकच 'कड्यावरचा गणपती' हे स्थान आहे.तिथे जातानाच एका spot वरून समुद्र,बीचचे ultimate दृश्य दिसले. तो scene इतका सुंदर होता की आम्ही गाडी थांबवून फोटो काढण्याचा मोह नाही आवरू शकलो.दृश्य इतके सुंदर होते की आम्ही पाहतच राहिलो. एका बाजूने जमिनीचा काही भाग थेट् समुद्रात शिरला होता. तिथली हिरवीगार नारळाची, माडाची झाडं ही निळ्या समुद्राच्या अंगठीच्या खोबणीत बसवलेल्या टपो-या पाचूप्रमाणे भासत होती आणि वर स्वच्छ निरभ्र आकाश...दुरवर क्षितीज आणि समुद्र एकमेकांत असे मिसळून गेले होते की वाटलं त्यांना एकमेकांपासून दूर करणं साक्षात विधात्यालाही जमणार नाही. केवळ अवर्णनीय असं ते दृश्य होतं. निसर्गाने मनुष्याला किती भरभरून दिले आहे आणि तेही फुकट...!!! ख-या आनंद देणा-या गोष्टी अशाच निर्भेळ आणि शाश्वत असतात....
पुढे कड्यावरच्या गणपतीला जायला निघालो. रस्ता इतका अरूंद होता की एकावेळी कशीबशी एकच गाडी (खरं म्हणजे अर्धीच :D) पुढे जावी. अक्षरशः डोंगराच्या कड्यावर असलेला हा गणपती पहायला डोंगरावर गाडी न्यावी लागते. मात्र मंदिरात गेल्यावर छान वाटते.स्वच्छ मंदिर, मोठे आवार आणि बाजूने आंब्याची झाडे..दर्शन घेऊन आम्ही पुढच्या प्रवासाला निघालो.....
आमचे पुढचे डेस्टीनेशन होते केळशी. केळशी म्हणजे अत्यंत छोटे पण सुबक् आणि प्युअरली कोकण म्हणता येईल असे गाव. दाट हिरवीगार झाडी, दूरवर पसरलेल्या आंब्याच्या बागा आणि उंच् उंच माड. केळशीमध्ये महालक्ष्मीचे मंदिर आहे.

तिथे दर्शन घेऊन जवळच असलेल्या 'याकुब बाबां'च्या दर्ग्यात गेलो. छत्रपती शिवाजी महाराजांनीही याकुब बाबांचे दर्शन घेतले होते.त्यावेळी त्यांनी दर्ग्यासाठी काही जमीन इनाम दिली होती,ती आजही आहे. केळशी गाव खरोखरच खूप मस्त आहे. अगदी remote kokan...
ट्रीप सुरू झाल्यापासून आमचा एकही spot आम्हाला bore वाटला नाही.उलट उत्तरोत्तर ट्रीप रंगतच गेली.
केळशीहून बाणकोटला आलो.बाणकोटच्या किल्ल्यावरून समुद्रात पाहताना तर अंगावर शहारे आले होते. भन्नाट रोंरावणारा वारा, डोंगरावरचा किल्ला, त्याचे मोठमोठाले बुरूज सारंच अद्भुत होतं.

तिथे एका बुरूजाखाली सारेजण बसून राहिलो.दूरवर दिसेल तिकडे केवळ समुद्रच होत. नुसती कल्पना केली की रात्रीच्या वेळी जर तिथे बसून राहिलो तर काय सुंदर वाटेल, दूरवर मिणमिणणारे होड्यांवरचे दिवे,बेभान वारा आणि स्तब्ध करणारी शांतता...!!! पण रात्रीपर्यंत थांबणे आमच्या नशीबात नव्हते म्हणून आम्ही पुन्हा एकदा ते दृश्य imagine करून परतीला निघालो. जाताना वाटेत एक म्हातारबाबा भेटला. त्याने आम्हाला झाडावरून कै-या काढून दिल्या.म्हातारा फारच काटक होता, ८७ वर्षे वय होते, पण वाटत नव्ह्तं...
बाणकोटहून हरिहरेश्वरला गेलो. अंतर फारसे नाही. त्यामुळे लगेच पोचलो. हरिहरेश्वरचे वर्णन मी अनेकांकडून ऐकले होते की खूपच ultimate spot आहे वगैरे, पण प्रथमदर्शनी मला ultimate वगैरे काही वाटले नाही. हरिहरेश्वराचे दर्शन घेऊन मंदिराच्या पिछाडीस असलेल्या डोंगरावर प्रदक्षिणा मार्गाकडे गेलो. भयंकर उकडत होते. एका spot ला आम्ही सर्वजण जागच्या जागी थबकलो.आपल्या समोरून एक बंद पडदा उघडावा आणि प्रचंड मोठा सोनेरी खजिना हाती पडावा असे ते दृश्य होते. हरिहरेश्वरचे वर्णन सारेजण ultimate या शब्दाने का करत होते हे तो spot बघितल्यावर मला समजले. दोन कातीव कड्यांमधून प्रदक्षिणा मार्ग थेट समुद्रात जात होता. उंच म्हणजे कमीत कमी तीन-चारशे फूट उंचीचे ते कडे होते. त्यातून जाणारी वाट म्हणजे जणू खिंडच..!

समोर खालच्या बाजूस फेसाळणारा समुद्र आणि त्यालगतचा प्रदक्षिणा मार्ग. खरंच मी खूप समुद्रकिनारे पाहिलेत, पण असे दृश्य कधीच पाहिले नव्हते. Wonderful, Beautiful, Incredible वगैरे जितकी विशेषणे लावावीत तितकी कमीच...
कड्यांवरून उतरून खाली कातळांवर उतरलो. काळ्या कुळकुळीत फत्तरांपासून तयार झालेला प्रदक्षिणा मार्ग. मागच्या बाजूला मोठे फत्तरी कडे. समुद्रच्या लाटा,वारा,उन यांच्या अभिक्रियेमुळे त्या कड्यांनादेखील मोठ्मोठी धारधार छिद्रे पडली होती. एकदम photogenic location होते...मग काय, आमच्या कॅमे-यांचा लगेच क्लिकक्लिकाट सुरू झाला. खाली कातळावर बसून मागून लाटा उफाळणारे अनेक फोटो काधले. तेवढ्यात आमच्यातल्याच एकाचा आवाज आला, तो ओरडत होता "डॉल्फिन, डॉल्फिन". त्याच्या बोटाच्या दिशेने पाहिले तर डॉल्फिनच्या दोन जोड्या आमच्यापासून अगदी जवळून म्हणजे ४०-५० फूटांवर् पोहत होत्या. काय वर्णावे या आनंदाला. हे म्हणजे "सोने पे सुहागा" ठरले. हस-या चेह-याच्या त्या dolphins चे आम्ही shooting देखील केले. इतक्या सुंदर अविष्कारांनंतर आमचा उकाडा कुठल्या कुठे पळून गेला, खूप मजा केली. बागडलो. प्रदक्षिणा मार्गावरूनच पुढे जाताना खास कोकणी चवीचे जांभूळ सरबत प्यालो. मस्त tasty होते.
हरिहरेश्वरच्या किना-यावर किती वेळ गेला कळालेच नाही. पण भूक जोरात लागल्यावर मात्र सर्वजण जागे झाले. हरिहरेश्वरचा समुद्र मात्र अत्यंत धोकादायक आहे. समुद्रात पोहायला परवानगी नाही.
हरिहरेश्वरच्या मंदिरापासून जवळच एका होटेलमध्ये जेवायला गेलो. स्वच्छ सारवलेले आवार व नारळाच्या झावळ्यांपासून बनवलेला मंडप असे ते छोटेखानी होटेल होते. लाकडी फळ्यांपासून बनवलेल्या बेंचवर सर्वजण बसून जेवणाची वाट बघू लागलो. पोटात कावळे ओरडत होते, उन तापले होते व उकाडा तर मी म्हणत होता. जेवण येईपर्यंत नुसते पाणीच पित होतो. थोड्याच वेळाने मस्त गरमा गरम कोकणी स्वादाचे जेवण आल्यावर सर्वांनी येथेच्छ ताव मारला.सोलकढी, कोकणी आमटीची टेस्ट अप्रतिम होती.इथे परत आम्हाला आमच्या बोलीचालीवरून आम्ही कोल्हापूरी आहोत हे इथल्या होटेलमालकाने बरोबर ओळखले. खरंच, आपलं गाव हीच आपली ओळख असते.
हरिहरेश्वरहून निघालो ते श्रीवर्धनला जायला. श्रीमंत थोरल्या बाजीराव पेशव्यांचे जन्मस्थान म्हणून मनात एक आस लागून राहिली होती. पण जेव्हा तिथे पोचलो, तेव्हा किंचीत निराशा झाली. श्रीवर्धनचा पेशव्यांचा वाडा म्हणजे आता एक छोटीशी शाळा आहे. इतका महान सेनानी, पण त्याचे एखादे चांगले स्मारक त्याच्याच जन्मगावात असू नये याचे राहून राहून वाईट वाटले.असो, काही गोष्टींना इलाज नसतो.
श्रीवर्धनमध्ये पोचल्यावर एक गंमत झाली. गावातून आम्हाला पेशव्यांच्या वाड्याकडे आणि श्रीवर्धनच्या बीचकडे जायचा मार्ग हवा होता. एका रिक्षा स्टॉपच्या डावीकडे वाडा तर उजवीकडे बीच होता. स्टॉपवर एकच रिक्षा होती, त्या रिक्षावाल्याला आम्ही मार्ग विचारला, तर त्या पठ्ठ्याने वर देखील न बघता, काहीही न बोलता केवळ बोटवारे (जे हाताने करतात ते हातवारे आणि बोटाने करतात ते बोटवारे हीः हीः हीः ) करून रस्ता दाखवला. आम्ही चारपाच वाक्ये बोललो, पण भिडू एक अक्षरही बोलला नाही. च्यायला इथले लोक असे बाहेरचे कोणी आल्यावर असे का बुजतात ते मला शेवटपर्यंत कळले नाही...
श्रीवर्धनचा बीचही म्हणावा तितका स्वच्छ वाटला नाही. त्यामुळे वेळ न दवडता आम्ही थेट दिवेआगरकडे कूच केले.
दिवेआगर हे मस्त टिपीकल कोकणी खेडेगाव. अत्यंत स्वच्छ, टापटीप असलेले गाव बघता क्षणीच आम्हा सर्वांना खूप आवडले.

दिवेआगरला गणपतीचे मंदिर आहे. दहा-बारा वर्षांपूर्वी गावातील एका स्त्रीला संकष्टीच्या दिवशी सोन्याच्या गणपतीची मूर्ती सापडली होती. ती मूर्ती या मंदिरात ठेवली आहे. अत्यंत सुबक, रेखीव नक्षीम केलेली ही मूर्ती पेशवेकालीन असल्याचे तेथील लोकांनी सांगितले.
दिवेआगरमध्ये पोचल्यावर पहिल्यांदा रहायची व्यवस्था करणे महत्त्वाचे होते. पण प्रश्न लगेच सुटला. दातार काकांच्या 'लक्ष्मी-केशव' निवासामध्ये आम्हाला जागा मिळाली, तीही अगदी reasonable rate मध्ये. दिवेआगरमध्ये घराघरांमध्ये अशी घरगुती निवासाची व्यवस्था आहे.
आम्ही राहिलो होतो ती खोली घराच्या मागच्या बाजूस होती. स्वच्छ सारवलेले अंगण,परसदारी आंबा,माड,रातांब्याची झाडं, विहीर असं मस्त वातावरण होतं. रूमवर आल्यावर फ्रेश झालो. समुद्राची गाज ऐकू येत होती. समुद्र पुन्हा खुणावत होता. म्हणून सर्वजण बर्म्युडा, टोवेल घेऊन बीचकडे रवाना झालो.
दिवेआगरचा समुद्र म्हणजे केवळ अप्रतिम!!! अतिशय स्व्च्छ किनारा आणि मुख्य म्हणजे गर्दी, गोंगाट, कोलाहल यांपासून दूर. आम्ही गेलो त्यावेळेस अगदी तुरळक गर्दी होती.
फटाफट सगळे पाण्यात उतरलो,अगदी गळ्यापर्यंत पाण्यात गेलो, पण समुद्रा एकदम safe वाटला. खूप दंगामस्ती केली, खेळलो, उड्या मारल्या, जवळजवळ दोन तास मनसोक्त डुंबलो व सुर्यास्त बघून रूमवर परतलो. अंगाला लागलेले खारे पाणी चटचटत होते. म्हणून विहिरीच्या थंडगार पाण्याने अंघोळ करून फ्रेश झालो.
७.३०- ८ च्या सुमारास गाव बघायला बाहेर पडलो. पण गाव एकदम छोटा. त्यामुळे किती आणि काय काय बघणार? रूमवर आलो. येता येता रात्रीच्या जेवणाची एका होटेलमध्ये ओर्डर दिली व पत्त्यांचा एक कॅट विकत घेऊन रूम वर आलो.
९.१५ च्या दरम्यान होटेलमध्ये जेवायला गेलो. मस्त गावरान चिकन केले होते. ('मस्त' हा शब्द मित्रांच्या सांगण्यावरून लिहित आहे. मी vegetarian आहे, त्यामुळे मी नुसताच नारळी भात वगैरे खाल्ला. आणि तोही मस्तच होता....:D ). Unlimited जेवण असल्यामुळे सर्वांनी भरपेट ताव मारला व १०.३० च्या सुमारास रूम वर परत आलो.
सर्वांना गुंगी आली होती, त्यातच समुद्रात दंगामस्ती केल्याने हातपाय दुखू लागले होते. तरीही लवकर न झोपता 'मेंढीकोट' चा डाव मांडून बसलो. बराच वेळ पत्ते खेळत होतो. रात्री पत्ते खेळत खेळत एक एक मेंबर निद्रादेवीच्या केव्हा अधीन झाला हे कळले देखील नाही.....