May 16, 2010

कोकण भ्रमंती २०१० - भाग १

लहानपणी शाळेमध्ये असताना दिवाळीच्या अगर उन्हाळी सुट्टीमध्ये मी कोकणात नेहमी फिरायला जायचो. अर्थात कोकण म्हटले की ठराविक गावे ठरलेली. मी राहतो कोल्हापुरात, त्यामुळे आमच्यासाठी कोकणची टूर म्हणजे आंबा घाट उतरुन रत्नागिरी,गणपतीपुळे,पावस हा मार्ग ठरलेला. काहीवेळा नातेवाईकांकडे लांजा,राजापूर, कुडाळ येथेही जाण्याचा योग आला. त्यामुळे जवळच्या तारकर्लीपासून अगदी गोव्यापर्यंतचा कोकणपट्टा पिंजून काढलेला. करूळ घाट, फोंडा घाट हे रस्ते ओळखीचे वाटायचे, वाटतात.परवा सहज मनात आले की यंदा आपण जरा वेगळ्या धाटणीचा प्रवास करू. वेगळा म्हणजे असा की जो आपल्याला माहिती नाही अशा destinations चा.मग चक्रे फिरू लागली, नेटवरून माहिती गोळा करून रूट फिक्स केला.

एकूण तीन दिवस दोन मुक्कामांसह हा प्रवास आम्ही ठरवला आणि मी व माझे सात सहकारी यांच्यासह कोकणपट्टीच्या प्रवासाला नावही देऊन टाकले - "कोकण भ्रमंती २०१०".

रूट-
गुहागर-दाभोळ-दापोली-हर्णे-आंजर्ले-केळशी-बाणकोट-हरिहरेश्वर-श्रीवर्धन-दिवेआगर-मुरूड जंजीरा

या प्रवासात मला खुप निरनिराळे अनुभव आले. काही मजेशीर,काही थ्रिलींग तर काही विचार करायला लावणारे, पण सोबतीला उत्साही सहकारी आणि तेही trip च्या मूड मध्ये असले की प्रवास हा अगदी refreshing च असतो याची प्रचिती मी पुन्हा एकदा घेतली...

दि.६ मे २०१०-

अगदी सुरूवातीपासूनच आम्ही प्रवासाचे प्लॅनिंगप्रमाणे execution करायचे ठरवले होते(?), पण म्हणतात ना की प्लॅनिंग हे फक्त कागदावरच असते, प्रत्यक्षात मात्र थोडेफार changes हे करावेच लागतात, हे आम्हाला ट्रीपच्या अगदी पहिल्या टप्प्यात मान्य करावेच लागले. आमच्या ठरलेल्या प्लॅनिंगप्रमाणे पहिले destination हे रत्नागिरी जिल्ह्यातील 'गुहागर' हे होते. तिथे जाण्यासाठी आम्ही कराड, कुंभार्ली घाटातून उतरून चिपळूण व तिथून पुढे गुहागर असा मार्ग ठरवला होता. पण आमच्या काही सहका-यांच्या हट्टामुळे आंबा घाटमार्गे साखरपा, देवरूख, संगमेश्वर्,चिपळूण असे जायचे ठरले. सकाळी ६.३० ला प्रयाण केले. पहाटे लवकर उठून आवरल्यामुळे सर्वांना सपाटून भूक लागली होती.मलकापुरातील मिलन होटेलमध्ये मस्तपैकी सर्वांनी नाष्टा केला व पुन्हा रस्त्याला लागलो. आमच्यातील काहीजण पहिल्यांदाच कोकण प्रवासाला निघाले होते. त्यामुळे त्यांना कोकणातले स्वच्छ चकचकीत रस्ते, मोठमोठाले वृक्ष हे सर्व नवीन होते. सर्वजण डोळे विस्फारून निसर्गाचे रूप पाहत होते. सोबतीला चेष्टा,मस्करी, दंगा,गाणी हे सुरूच होते. मला मात्र मी न पाहिलेल्या destinations च्या दर्शनाची आणि मला आवडणा-या कोकणच्या सफरीची ओढ लागून राहिली होती, त्यामुळे मी त्याच विचारात होतो.अर्थात त्यावेळी मीही चेष्टा,मस्करी,दंगा करतच होतो आणि निसर्गाचे देणेही बघत होतो.
गुहागरला जाताना वाटेत डाव्या बाजुला 'हेदवी' गावाचा फाटा लागतो,तर उजव्या बाजूस 'वेळणेश्वर' गावाचा रस्ता लागतो.ही दोन्ही गावे आमच्या टूर प्लॅन मध्ये नव्हती.समोरचा रस्ता सरळ गुहागरला जात होता.पण जवळपास कुठेच मार्गदर्शक बोर्ड नव्हता, म्हणून चौकात एका दगडावर बसलेल्या म्हातारीला गुहागरचा रस्ता विचारला. माणसाला बोलायला जर का पैसे पडले असते तर जसा चेहरा होईल, तसा काहीसा चेहरा करून म्हातारीने केवळ हातानेच सरळ जाण्यास खुणावले.आम्ही सरळ गुहागरला पोचलो.तिथं प्रथमच समुद्रदर्शन झाले.समुद्र पाहिल्यावर आम्च्यातले काहीजण अक्षरशः आनंदाने वेडे होऊन नाचू लागले. काही उत्साही मंडळींनी तर सरळ बर्म्युडा परिधाना करून समुद्राकडे कूच केले. आमच्या उत्साहाकडे पाहून तिथल्या काही स्थानिक मंडळींनी एका सेकंदात आम्ही घाटावरून आलो आहोत (म्हणजेच आम्ही 'घाटी' आहोत :-D ) हे ओळखले.
ट्रीपमध्ये ज्या ज्या वेळी समुद्र पाहिला त्या त्या वेळी मला समुद्राचा वेगळाच भाव जाणवला. गुहागरचा समुद्र म्हणजे खोडकर खेळगड्यासारखा वाटला.भरदुपार असूनसुद्धा पाणी तसे थंडच होते.समुद्र मधूनच मोठ्या लाटांसह खवळायचा.आमच्यातील काहीजणांचे पाय खेचायचा.आम्ही खूप दंगा केला,मनसोक्त तासभर डुंबलो. स्वच्छ समुद्रकिनारा,सुरूची व नारळाची झाडे यामुळे गुहागर नयनरम्य वाटले.समुद्रात पोहून झाल्यावर किना-यावर अंघोळीसाठी आलो.तिथे किना-यावरील घरांमध्ये अल्प दरात अंघोळीची सोय आहे. विहिरीच्या थंडगार पाण्यात अंघोळ आटोपली. समुद्रात खेळल्यामुळे सर्वांना आता जोराने भूक लागली होती व सर्वांच्या जिभा अस्सल कोकणी जेवणाच्या स्वादासाठी आसुसल्या होत्या...
किना-याजवळच एक छोटे होटेल होते. तिथे घरगुती पद्धतीचे कोकणी जेवण मिळाले.मी स्वतः शाकाहारी आहे, पण आमच्यातल्या काहीजणांना खास कोकणी मच्छी खाण्याची हुक्की आली होती. पण उशीर झाल्यामुळे सर्वांनाच शाकाहारी जेवणावरच भागवावे लागले.मस्त कोकणी खोब-याची आमटी व सोलकढीमुळे छान वाटले.
आज आमचा मुक्काम दापोलीला होता व आमच्याकडे अजून sufficient time होता.त्यामुळे गुहागरपासून २५ कि.मी. परत मागे हेदवीला जाऊन, तिथला दशभुजा गणेश पाहून वेळणेश्वरही करायचे ठरवले. हे दोन्ही spots आमच्या प्लॅनिंगमधले bonus spots ठरले.हेदवीचा गणपती डोंगरावर आहे.तिथे जाण्यासाठी घाट चढावा लागतो.पण मंदिर छान आहे. दुपारची वेळ असल्याने मंदिराच्या आवारातील फरशी चांगलीच तापली होती.

गणपतीचे दर्शन घेतल्यावर परिसरात सर्वांनी फोटोसेशन केले. मंदिर पेशवेकालीन असल्याचे समजले.तिथून परत येताना सारेजण वेळणेश्वराला गेलो होतो. अत्यंत सुंदर मंदिर व स्वच्छ समुद्रकिनारा लाभलेले वेळणेश्वर हे खरोखरीच नयनरम्य आहे.
दूरवर पसरलेला समुद्रकिनारा पहात आम्ही एका होटेलात बसून कोकम सरबत प्यालो, अगदी original स्वादाचे. कोकम प्याल्यावर आपण शहरात पितो त्या कोकम सरबताची मला कीव कराविशी वाटली. गुहागरच्या प्रवासाला हेदवी व वेळणेश्वर च्या साथीने चार चांद लागले.आम्ही परत गुहागरच्या दिशेने निघालो.दापोलीला जाण्यासाठी धोपवेमार्गे फेरीबोटीधून प्रवास करावा लागतो. हा आमच्यातील बहुतेक जणांचा पहिलाच फेरीबोट प्रवास.आमच्यासारखेच इतरही अनेक प्रवासी होते. त्यांच्या बसेस,गाड्या सामावून फेरीबोट पलीकडच्या किना-याला लागली.आमच्यासाठी हा experience अगदी नविन व निराळा होता.खुप मजा आली.पुष्कळ फोटो काढले.पलीकडच्या किना-यावरून आम्ही दाभोळच्या दिशेने निघालो.वाटेत जाताना दाभोळचा बहुचर्चित (बंद पडलेला की पाडलेला?) दाभोळ वीज प्रकल्प पाहिला.
रात्री ८.३० च्या सुमारास दापोलीला पोचलो.दापोली हे कोकणातले छोटेसे टुमदार शहर आहे.तिथे एका लोजवर hall घेऊन राहिलो.अगदी माफक दरात मस्त hall मिळाला.एका होटेलध्ये शाकाहारी व मच्छी असे दोन्ही प्रकारचे जेवण मिळाले.त्यामुळे सर्वच जण खुष झाले.ट्रीपचा पहिला दिवस अगदी मजेत छान गेला.एवढा प्रवास करूनही जराही थकवा अगर कंटाळा वाटत नव्हता.दुस-या दिवशी लवकर उठायचे म्हणून लवकर झोपी गेलो.झोपताना डोळ्यांसमोर होते ते कोकणातले स्वच्छ रस्ते,हिरवीगार झाडी, गुहागरचा समुद्र आणि बरेच काही....

No comments: