...पाऊस!!
शब्दाच्या उच्चारानंच काहीतरी भरून येतं,बरसू लागतं...
आतल्या हुरहुरी जाग्या होतात...विरहाचे कढ डोळ्यांतून वाहू लागतात. पुन्हा पाऊसवाटांना गती येते,मन शरणागतीला येतं. जुनी नाती नव्यानं जुळवू पाहतं...
वाटतं...,इथली हार इथली जीत कुठं नोंदली जाणार आहे?
पण हा ॠतू निसटून गेला तर...
तर मग काय....उन्हाळाच...!!!
...पाऊस!!
रस्ते भिजताहेत..प्रतिबिंब रस्त्याला अगदी बिलगून चालताहेत..
कोपर्यावरचे कॉफी हाऊस, दोन फिल्टर कॉफी.. वाफाळलेला कॉफीगंध.. नाकातून थेट पोटात.. वाफेपलीकडे.. एक निस्तब्ध मन.. बोलू पाहातंय.. पण न बोलताही ऐकू येतंय....
मधेच ताडपत्री जोरात वाजू लागते.. झाड आवेगात कोसळू लागते.. सहज काही थेंब वार्यानं येतात..थोडं भिजतो..
सुखावतो...
कॉफीचा एक कडक कडक घुटका अलगद घेतो...समजूतदार पापण्या एकमेकांकडे पाहतात...
पाऊस बरसतच राहतो.. कॉफी संपते.. वेटर जवळ येतो; आपण ढगात पाहत म्हणतो....,"और एक कॉफी कडक!"
No comments:
Post a Comment