May 18, 2010

कोकण भ्रमंती २०१० - भाग ३

कोकण भ्रमंती २०१० - भाग ३

८ मे २०१०

पहाटे ५.३० ला वीरने जेव्हा हाक मारली तेव्हा जागे झालो. आज आमच्या प्रवासाचे दोन टप्पे (खरे तर एकच) होते. एक म्हणजे गणपतीचे दर्शन घेणे व दूसरे म्हणजे मुरूडला जाऊन जंजिरा किल्ला पाहणे. पैकी सकाळी लवकर आवरून सुवर्ण गणेशाचे दर्शन घेऊन आलो. काल रात्री होटेलमध्ये जेवायला गेल्यावर होटेल मालकाने जंजि-याकडे जाण्याचा सोयीस्कर व जवळचा मार्ग सांगितला. तो असा की, दिवेआगरहून मुरूडला by road जाण्यापेक्षा दिवेआगरहून दिघी या गावी जायचे व दिघी बंदरातून थेट जंजि-यावर Launch ने समुद्रसफ़र करायची. आम्ही होटेलमालकाचे suggestion ऐकण्याचे ठरवले. त्याला दोन कारणे होती.एक म्हणजे त्यामुळे आम्हाला मुरूडला वळसा घालून जावे लागणार नव्हते, ज्यामुळे आमचा वेळ, पैसा आणि जवळपास ८० कि.मी. अंतर वाचणार होते आणि दूसरी गोष्ट म्हणजे दिघी हून जवळ जवळ १० कि.मि. चा समुद्रप्रवास कि ज्यासाठी आमच्यातील प्रत्येकजण excited होता.
गणपतीचे दर्शन घेऊन दिघी ला पोहचायला तासभर लागला. ८.३० ला जेव्हा दिघी मध्ये पोहचलो, तेव्हा इथेही हर्णेसारखाच नजारा होता. लोक नुकतेच जागे होत होते. Launch ची तिकिटे काढण्यासाठी Launch office मध्ये गेलो तेव्हा तिथल्या माणसानेदेखील आमच्याकडे त्रासिक चेहरा करून पाहिले. "इतक्या सकाळी सकाळी कशाला आलेत हे इकडे?" असे काहीतरी तो मनातल्या मनात म्हटला असावा.
शनिवार असल्यामुळे गर्दी होणार असे वाटले होते. पण नऊ वाजेपर्यंत काहीच चिन्हे दिसेनात. आम्ही बराच वेळ धक्क्यावर फोटोसेशन करत बसलो होतो. शेवटी launch वाल्यानेच १०० लोकांची launch उण्यापु-या २५-३० प्रवाशांसाठी समुद्रात सोडली आणि राजेशाही थाटात आम्ही जंजिरा काबीज करायला निघालो.
समुद्रात launch आत गेल्यावर मात्र सर्वजण केवळ लाटांकडे बघत होते. बरेच वेळा लाटा जोराने आपटून पाणी आत येत होते. किना-यावरून पाहताना जंजिरा अगदी जवळ असल्याचे भासत होते. पण प्रत्य्क्षात मात्र किना-यावरून किल्ल्यापर्यंत जायला जवळजवळ अर्धा तास लागला.
जसजसे किल्ल्यच्या जवळ पोहोचायला लागलो, तसतसे किल्ल्याचे अजस्त्र व विराट रूप नजरेत भरू लागले. सिद्दिचा जंजिरा हा किल्ला शेवटपर्यंत अजिंक्य का राहिला हे त्या किल्ल्याची भक्कम बांदणी व मोठमोठाले बुरूज व तटबंदी बघितल्यावरच समजले.. तब्बल बावीस एकरांत पसरलेला हा महाकाय दुर्ग केवळ अवर्णनीय आहे. समुद्रातून किल्ल्याचे प्रवेशद्वार सहजी नजरेस पडू नये अशा खुबीने बांधले आहे.
किल्ल्यापासून तीन-चारशे मीटर अंतरावर आमची launch पाण्यातच थांबली व किल्ल्यापासून एक छोटी होडी आम्हाला pick up करायला आली. तिच्यातून बसून आम्ही किल्ल्यावर प्रवेशते झालो. अजस्त्र दरवाजा व बुरूजांवरील भल्या मोठ्या तोफा बघूनच शत्रूला धडकी भरावी असे ते बांधकाम होते.
किल्ल्यात आत गेल्या गेल्या एक गाईड आम्हा होडीतल्या उतारूंकडे आला.त्याने आम्हाला टिपीकल गाईडच्या आवाजात माहिती सांगायला सुरूवात केली व संपूर्ण किल्ला दाखवण्यासाठी ५५०/- रू. लागतील असे म्हणाला. ५५०/- रू. चा आकडा ऐकल्यावर मात्र आम्ही सर्वांनी त्याची अशी काही खेचली व त्याला टोमणे मारले की बस्स्...त्याने आमच्या ग्रुपचा नादच सोडून दिला व तो पळून गेला. यावर आमच्यातील एकाने "गनीम भाग गया..." अशी टिप्पणी केली व आम्ही सारेचजण हास्यकल्लोळात बुडालो...
जंजीरा पाहताना मात्र त्याकाळच्या प्रचंड वैभवाची कल्पना आली. किल्ल्याच्या आतमध्ये आता केवळ पडके अवशेष आहेत. एका बुरूजावर 'कलाल बांगडी' नावाची तोफ ठेवली होती. पुरंदरेंचे 'राजा शिवछत्रपती' वाचताना या तोफेचा उल्लेख आला होता. केवढी मोठी व अजस्त्र तोफ!समुद्रातून येणा-या शत्रूच्या गलबताच्या एका धडाक्याबरोबर चिंधड्या उडवून टाकेल अशी...!!
किल्ल्यावर आतमध्ये गोड्या पाण्याचे दोन मोठे तलाव आहेत. बेफ़ाम लाटांशी, वा-याशी स्पर्धा करत हा किल्ला असा उभा आहे की वाटते त्याला अजून हजार-दोन हजार वर्षे तरी काही होणार नाही.
किल्ल्यावरील दरबार वगैरे पाहून झाल्यावर व किल्ला फिरून झाल्यावर सर्वजण परत मुख्य दरवाज्यापाशी जमलो. अक्षरशः boiler मध्ये ठेवल्यासारखे उकडत होते. इतका प्रचंड उकाडा होता की बस्स... आमचे कपडे घामाने डबडबले होते. महाराष्ट्रातल्या इतर किल्ल्यांसारखीच याचीही अवस्था आहे. शासनाची अनास्था, लोकांना इतिहासाचे न कळलेले महत्त्व आणि ऐतिहासिक ठिकाणे खराब करण्याची, त्यांची अवहेलना करण्याची मनोवृत्ती हे सर्व पाहून मन विषण्ण झाले.
दूरवरून launch आमची येताना दिसली. परत लहान होडीने आम्ही launch कडे निघालो. दुपारचे बारा वाजत होते.उन तापले होते. आता मात्र launch मधून सुमारे दीड दोनशे पर्यटक आले होते. जाताना आम्ही जसे उत्स्साहात होतो तसेच ते आता होते. किल्ला फिरल्यावर मात्र आमची जी अवस्था झाली त्यावरून असे वाटले की त्या सिद्दिने जंजिरा इतकी वर्षे कसा काय सांभाळला ते त्यालाच माहित... :)
Launch मधून परत दिघी कडे निघालो. जाताना एक मोठे परदेशी मालवाहू जहाज दिसले. जाताना वारे लागल्यामुळे जरा हायसे वाटले. किना-यावर उतरल्या उतरल्या थंडगार सरबत घेतले व return journey साठी गादीत येऊन बसलो. परत जाताना आलो त्याच मार्गे म्हणजे चिपळूण-देवरूख-संगमेश्वर-आंबा-कोल्हापूर जाण्याचे ठरवले.
आम्ही उन्हातून इतका प्रवास केला होता, पण संपूर्ण प्रवासात कुणालाही थकवा जाणवला नाही.
खरं म्हणजे अशा ट्रीप्स प्रत्येकाने वर्षातून किमान एकदा तरी केल्याच पाहिजेत.अशाने मनाची व शरीराची दोहोंची refreshment होते. वास्तविक समुद्रदर्शन हा लिहिण्यासाठी एक वेगळा विषय होऊ शकतो. पण थोडक्यात सांगायचे झाले तर जर एखाद्याला आपण खूप मोठे झालो आहोत किंवा खूप शहाणे झालो आहोत असे वाटू लागले, तर त्याने सरळ कोकणात एखाद्या समुद्र किना-यावर यावे, एखाद्या शांत आणि एकांत कड्यावर बसून अथांग आणि जिकडे नजर पडेल तिकडे पसरलेल्या अफाट रत्नाकराला, दर्याला पहावे म्हणजे आपण किती क्षूद्र आहोत व आपल्या मोठेपणाचा अहंकार किती मिथ्या आहे हे कळून चुकेल...
कोल्हापूरात पोहचायला रात्री ९.३० वाजले. घरी आल्या आल्या बहिणीने पहिला प्रश्न केला - "काय रे, चेहरा किती काळा पडला आहे उन्हाने?"
तिला कसे सांगू मी मनातून किती उजळलो होतो ते....???

1 comment:

हर्षल वैद्य said...

पिकनिक एकदम झक्कास झाली म्हणायची राव......